कोरोना एक वास्तव – अवघाचि देश एक झाला

SHARE THE NEWS

by Vijay Bagale

कोरोना.. काय तो व्हायरस.. नुसताच डोक्याला ताप… अख्ख्या जगाला कामाला लावणारा एक भयंकर विषाणू.. अजूनही त्याच्यावर औषध सापडत नाहीये. तरी संशोधक, शास्त्रज्ञ करताहेत प्रयत्न त्यावर लस किंवा औषध शोधून काढण्यासाठी… जेणेकरुन लवकरात लवकर हा रोग (ज्याला जागतिक आरोग्य संघटनेने महामारी घोषित केलीय) आटोक्यात यावा आणि नाहक मरणारे जीव वाचावेत. या रोगाने मानव प्रजातीला खूप मोठं नुकसान पोहचवलंय आणि ते सुरुच आहे. सामान्य नागरिकच नव्हे तर सरकारे यांचा सुध्दा गोंधळ उडालेला आहे. कुठे विदेशात गेलेल्या भारतीयांना भारतात प्रवेश द्यायचा कसा द्यायचा, आपल्या देशातील विदेशी पर्यटक किंवा नागरिकांना बाहेर कसं पाठवायचं, अशा समस्यांवर राज्य आणि केंद्र सरकार तोडगा शोधत आहेत. खरं तर हा विषाणू आटोक्यात येण्यासारखा दिसत नसला तरीही सरकारांच्या जनजागृतीमुळे आणि कोरोना संशयितांना वा बाधितांना वेळीच उपचार उपलब्ध करुन घरी पाठवलं जातंय.

या दरम्यान काही गोष्टी प्रकर्षाने जाणवतात. त्याचं खरं तर अप्रुप वाटावं की खेद, आकलनाच्या पलीकडचं आहे. नुकत्याच दिल्ली विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दिल्लीच्या अनेक भागांत दंगली उसळल्या. त्याला पार्श्वभूमी आहे त्या सध्या सुरु असलेल्या सुधारित नागरिकत्व कायद्याच्या (सीएए) विरोधातील आंदोलन. शाहीन बाग हे नाव आता कदाचित गावागावात पोहचलं असेल. तर दिल्लीतील शाहीन बागेतल्या या आंदोलनाचाच विरोध म्हणून दिल्लीत आंदोलन सुरु करण्यात आलं. अर्थातच सीएए किंवा एनआरसी मागे घेणार नाही, असे गृहमंत्री अमित शाहांनी स्पष्ट केल्याने या कायद्याला विरोध तीव्र झाला. याचा फटका आपल्याला बसू शकतो, या भीतीने या कायद्याचे समर्थक आणि काही भाजप नेत्यांनी या विरोधाला त्यांच्या पध्दतीने मोडून काढण्याची भाषा केली. झालं. दिल्लीत दंगली उसळल्या. त्यानंतर काय-काय घडलं, तो पट आपणासमोर आहेच.

मात्र, या कोरोनाने आंदोलनासारख्या लोकशाहीच्या अस्त्राला बोथट केलं. विशेष म्हणजे ना कुणी कायद्याच्या समर्थनार्थ आंदोलन करतंय आणि ना कोणी विरोधात. सगळे शांत. ना कुणी जातिधर्मांमध्ये भांडणं लावतंय ना कोणी राजकीय आंदोलने करतंय. अपवाद एक दोनच. सर्व जण कसे जाती-धर्म विसरून अगदी मंदिर – मस्जिद विसरुन रुग्णालयांची वाट पकडू लागलेत. धर्म-जातींपेक्षा जीव वाचवणारे डॉक्टर्स आता सर्वांना देव वाटू लागलेत. संकटात देव आठवतो किंवा देवाला प्रार्थना केली पाहिजे, असं म्हणतात. मात्र देशात तर मंदिर-मस्जिदंच बंद करण्याची ऐतिहासिक वेळ आलीय. नागरिक स्वच्छतेसंदर्भात कमालीचे जागरुक झालेत. हात धुणे, धूम्रपान टाळणे, रस्त्यावर न थुंकणे, घरं, परिसराची स्वच्छता करणे, अशा कित्येक सवयी लोकांनी स्वतःला लावून घेतल्यात. शेवटी जीवन-मरणाचा प्रश्न आहे. हे परिवर्तन घडवून आणण्यासाठी शाळेतले शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते, सरकारे किती-किती झटलेत मात्र त्यांच्या प्रयत्नांना तेवढं यश आलं नाही, तेवढं यश कोरोनाला आलंय. हे अद्भुतच. माणसं मरताहेत, हेही वाईटच. पण हे किती दिवस. तहान लागली की विहीर खोदायची, अशा मानसिकतेच्या आपल्या समाजाला आता वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणे, भेदभाव न करणे, जातीय-धार्मिक तेढ निर्माण न करणे या आणि अशा अनेक चांगल्या सवयींचा ठेवा आयुष्यभर जपता येईल का? शंकाच आहे. ही शंका दूर होऊन ‘अवघाचि देश एक होण्याचा’ तो दिन लवकर येवो, एवढीच माफक अपेक्षा…

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *